यवतमाळ. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामावेशी, सर्वस्पर्शी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची दारे प्रशस्त करणारा आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रवक्ते ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. धर्मपाल मेश्राम बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास येणारा नागपूर ते गोवा महामार्ग यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाची दारे उघडेल तर अर्थसंकल्पात मांडलेली बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना ही सामाजिक न्यायाच्या वाटचालीला गती देईल, असा विश्वासही भाजपा प्रवक्ते ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
वित्तमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प मागील 15 वर्षातील सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे विरोधकांनीही मान्य केले असल्याचे ऍड. मेश्राम यांनी सांगितले. अर्थसंकल्पाची योग्य अंमलबजावणी करताना त्याचा लाभ प्रत्येक घटकाला पोहोचावा यासाठी श्री. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रयत्न आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात प्राप्त उपसूचनांचा सुद्धा त्यात समावेश करून जिल्ह्यातील नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाने या मार्गावरील भागातील विकासाचे चित्र पालटले आहे. त्याच धर्तीवर प्रस्तावित नागपूर ते गोवा महामार्ग हा यवतमाळच्या विकासाची दारे उघडेल असेही ऍड. मेश्राम म्हणाले.
अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा करताना शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, विद्यार्थी या सर्वांच्या सर्वांगिण विकासाचे दूरदृष्टीकोन पुढे ठेवून मांडलेला अर्थसंकल्प ख-या अर्थाने सामाजिक न्यायाची प्रतिपूर्ती करणारा असल्याचे भाजपा प्रवक्ते ऍड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
इतर मागासवर्गीयांचे हक्काचे घर पूर्ण करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या कार्याला समर्पीत ‘मोदी आवास घरकुल योजना’, अनुसूचित जाती जमातीसाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेतंर्गत १ लक्ष ५० हजार घरकुले व त्त्यात मातंग बांधवांसाठी २५,००० घरकुले, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, शिक्षण सेवक, कोतवाल, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत, एक रूपयामध्ये शेतक-यांचा पीक विमा व केंद्राच्या धर्तीवर प्रत्येक शेतकर्याच्या खातात वार्षिक ६ हजार रू ची रोख मदत अशा महत्वाच्या योजना, महिला, आदिवासी, इतर मागासवर्गीयांसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाची संकल्पना, ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ, माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला २५ कोटी निधी अशी भरीव तरतूद, आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना, दादर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पुर्णत्वासाठीची भरीव तरतुद, भारतातील पहिली शाळा सुरू झालेल्या पुण्यातील भिडे वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, अमरावती येथे रिपब्लिकन नेते रा सु गवई यांचे स्मारक, वाटेगाव येथे साकारले जाणारे लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक अशी भरीव आणि सर्वसमावेशक मांडणी राज्याच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच झाल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात येणारी पाच नवीन महामंडळे आणि त्याला मिळणार 50 कोटींचा निधी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देईल, असेही ऍड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.