Published On : Thu, Apr 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘I am so happy’ म्हणतं नृत्यावर थिरकले चिमुकले

- चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा: आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी.
Advertisement

नागपूर. शाळेचा पहिला दिवस असो वा, पहिल्या वार्षिक स्नेहसंमेलनात स्वतः सादर केलेला कलाविष्कार. पहिला अनुभव हा नेहमीच अविस्मरणीय असतो. अशाच अविस्मरणीय क्षणाची अनुभूती नागपूर महानगरपालिके तर्फे संचालित सहा इंग्रजी माध्यम शाळांच्या प्रथम वार्षिकोत्सव कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली. ‘I am so happy’ म्हणतं विविध नृत्यांवर चिमुकले विद्यार्थी थिरकले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. आकांक्षा फाऊंडेशन या शाळांच्या व्यवस्थापनात सहकार्य करीत आहे.

रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, माजी क्रीडा समिती सभापती श्री. प्रमोद तभाने, माजी शिक्षण समिती सभापती श्री. दिलीप दिवे, मनपाचे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पूसेकर, माजी शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीती मिश्रीकोटकर, मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, श्री. मनीष सोनी, श्री. विनय बागडे, आकांक्षा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ तनेजा, नागपूरचे संचालक श्री. सोमसुर्व चॅटर्जी यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी, आकांक्षाचे शिक्षक, स्वयंसेवक व हजारो पालक उपस्थित होते.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, मनपाद्वारे आकांक्षा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संचालित सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह इतर शाळांमध्ये ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मनपाच्या शाळा या कुठल्याही खाजगी शाळांच्या तुलनेत मागे नाही, येथे विद्यार्थ्यांना विनामूल्य दर्जेदार शिक्षणासह क्रीडा, नृत्य, नाटक आदी सर्व बाबींचे प्रशिक्षण दिल्या जाते. मनपाचे शिक्षक देखील विद्यार्थ्यांचे सुप्त गुण, आवड ओळखून त्यांना भविष्यासाठी तयार करतात. असे सांगत श्री. राधाकृष्णन बी त्यांनी पालकांना सल्ला दिला की, आपल्या पाल्यांची इतरांसोबत तुलना करू नका, प्रत्येक विद्यार्थांची आपली आवड असते, त्यांच्यात कौशल्य असते त्याला प्रोत्साहन द्या. त्यांची कला जोपासा असा मौल्यवान सल्ला पालकांना दिला. याशिवाय मनपाच्या शाळेत सध्या इंग्रजी माध्यमातील KG 1, KG 2 आणि यावर्षी इयत्ता १ देखील सुरु करण्यात आलेली असून, हळूहळू वर्ग वाढविण्याचा मनपा प्रशासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकांना मार्गदर्शन करीत माजी महापौर श्री, दयाशंकर तिवारी म्हणाले की, मनपाच्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील समुपदेशन केले जाते. विद्यार्थांच्या कलागुणांना ओळखून त्यांना विकसित करून, उत्तम नागरिक घडवून समाजाला समर्पित करण्याचे महत्वपूर्ण कार्य मनपाच्या शाळांद्वारे केल्या जात आहे. असेही श्री, तिवारी म्हणाले. तर आकांक्षा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ तनेजा यांनी आकांक्षा फाउंडेशनद्वारे चालविण्यात येणाऱ्या राज्यभरातील विविध शाळांची माहिती दिली, तसेच आकांक्षा फाऊंडेशनचे नागपूरचे संचालक श्री. सोमसुर्व चॅटर्जी यांनी सहाही शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली.

वार्षिकोत्सव कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नंतर रामभाऊ म्हाळगीनगर मनपा इंग्रजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांनी नृत्याविष्कार सादर केले. ‘I am so happy’ गाण्यावर नृत्य सादर केले. तर ‘इत्ती सी हंसी’, ‘मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी’ गाण्यावर नृत्यसादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर स्व.बाबुराव बोबडे मनपा इंग्रजी प्राथमिक शाळा, बाभुळबन मनपा इंग्रजी प्राथमिक शाळा, रामनगर मनपा इंग्रजी प्राथमिक शाळा, स्व.गोपालरावजी मोटघरे (खदान) मनपा इंग्रजी प्राथमिक शाळा, राणी दुर्गावती मनपा इंग्रजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांनी नृत्य, नाटक, गाणे सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली, आपल्या चिमुकल्यांना पहिल्यांदा मंचावर बघून पालकांचे आनंदाश्रू आपसूक डोळ्यातून बाहेर आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवीत उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सुरेश भट सभागृह गुंजून उठले.

Advertisement