Published On : Mon, Apr 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरे यांना सत्तेचे व्यसन! प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका

Advertisement

सत्तेची नशा कधी, कशी व कुणाला लागली हे उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या व्यसनापायी ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजिर खुपसून २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर जनकल्याणाचे व अंत्योदयाचे साधन आहे, असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, तिन्ही पक्षाचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करायाचा आहे. मविआच्या सभामंध्ये एक नेता बोलताना इतर तीन लोक वेगळेच बोलतात, अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना ५० टक्के लोक निघून गेले होते. तीन पक्ष आप-आपले लोक आणतात गर्दी जमवितात, गाड्या-घोड्या लावतात लोक येतात एन्जॉय करतात आणि निघून जातात. जनतेला विकास हवा आहे. तोंडाच्या वाफा नाहीत.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

• भाजपाची विचारधारा महत्वाची !
अजित पवार हे भाजपात येणार अशी चर्चा आहे. हालचाली सुरु आहेत का, यावर श्री. बावनकुळे म्हणाले, याबाबत काहीच माहित नाही, त्यांच्या भूमिकेवर काहीच माहिती नाही. चर्चा खूप होत असतात, जर-तरला राजकीय जीवनात अर्थ नाही, त्यामुळे ज्या गोष्टीची चर्चा नाही. आमचा हा महिना प्रवेशाचा आहे. 25 लक्ष प्रवेश करुन घेणे हेच आमचे लक्ष्य आहे. बुथवर काम करणाऱ्यांचा प्रवेश सुरु आहे. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. त्यांना भाजपची विचारधारा मान्य असेल त्यांना यानुसार काम करायचे असेल स्वागत आहे.

•मृत्यूचे कुणीही राजकारण करू नये

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण कार्यक्रमावर विरोधकांना राजकारण करायचे आहे, कार्यक्रमात प्रकृती बिघडून मृत्यू झाला ही घटना दु:खद आहे. कुणामुळे काय झाले याला कोणताच अर्थ नाही. मृताना काय मदत करता येईल हे महत्वाचे आहे, असे सांगून त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

• विरोधकांत एकजुट होणार नाही
भाजपाच्या विविध राज्यातील सरकारांचे काम, डबल इंजिन सरकारांचे काम हे जनतेला पटल आहे. विरोधकांनी कितीही मोट बांधल्या तरी पंतप्रधान मोदीजी यांनी भारताला सर्वश्रेष्ठ करण्यापासून व लोकसभेत ४०० प्लस जागा जिंकण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही कामावर विश्वास ठेवणारे लोक आहोत तोंडाने वाफा फेकत नाही. विरोधकांत एकजुट होत नाही.

• फडतूस कोण हे सिद्ध झाले!
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे फडतूस असा पुनरुच्चार केला. यावर श्री. बावनकुळे म्हणाले की, कुटुंब प्रमुख जेव्हा फडतूस असतो, तेंव्हा घराचे वासे फिरतात. म्हणूनच 40 जिगरी सहकारी ठाकरेंना सोडून गेले. त्यावरून फडतूस कोण हे आपोआप सिद्ध होते. वारंवार स्वतः बद्दल ते बोलत आहेत. नागपूरच्या सभेत भाषण सुरु असताना खुर्च्या रिकाम्या होत्या. यातून त्यांचाच फडतूसपणा सिद्ध होतो.

• राममंदिराचा विषय समोपचाराने मार्गी लावला
पंतप्रधान मोदी यांच्यावर ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे विसरले, आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यांचे अनेक वर्षे तेंव्हा केंद्रात सरकार होते. राम मंदिर हा विषय काँग्रेसने चिघळत ठेवला. तो मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी न्यायालयीन व लोकशाहीच्या मार्गाने निकाली काढला. श्रीरामप्रभू हे राष्ट्रपुरुष आहेत. काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाने दोन धर्मांत तेढ निर्माण झाली. हे वास्तव उद्धव ठाकरे विसरतात का? मोदीजींनी सामोपचाराने हा विषय मार्गी लावला.

•आ. देशमुख यांचा बोलविता धनी
आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या दर्जाहीन टीकेवर प्रतिक्रीया व्यक्त केली ते म्हणाले, एका आमदाराने अशी टीका करणे योग्य नाही. त्यांचा बोलविता धनी कोण हे सर्वांना माहीत आहे. पुढच्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातील जागरूक नागरिक या आमदारांचा “योग्य उपचार” करणार आहेत.

Advertisement