नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील अत्रे ले- आउट परिसरातील आमदार समीर मेघे यांच्या कॉलेजमध्ये भाजप (BJP) खासदार, आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS ) पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी मनपा, विधानसभा, लोकसभा अशा विविध निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. संघाचे प्रांत प्रचारक अतुल मोघे यांच्या उपस्थितीत एकंदरीत दोन टप्प्यांमध्ये ही बैठक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडेल.
संघ मुख्यालयासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचेच असल्याचे आजच्या या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपाला कशा प्रकारे मदत करणार त्याबाबतची रणनीती या बैठकीत ठरविण्यात येईल. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील आमदार खासदार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.