नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हनुमान गल्ली येथील हॉटेल गुजरात जवळ शुक्रवारी सकाळी ऑटोचालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 55 वर्षीय व्यक्तीचा रक्तबंबाळ होऊन खून झाल्याच्या या घटनेने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
सीताबर्डीचे पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना सकाळी ११ वाजता देण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेतील गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे, असे ते म्हणाले.
मृत व्यक्तीची ओळख लोकांसमोर जाहीर करण्यात आलेली नाही आणि हत्येमागील हेतू अद्यापही स्पष्ट झालेला नाही.
या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला असून रहिवाशांनी सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारी आणि बलात्काराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, नागपूर पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.