नागपूर : महिलेला अश्लील व्हिडीओ पाटवल्या प्रकरणी नागपूर महापालिकेचे (NMC) मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अटकेला दुजोरा मिळाल्यानंतर महापालिकेकडून त्यांना निलंबित करण्यात आले.
नियमानुसार, सरकारी कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलिसांच्या ताब्यात असेल तर त्याला निलंबित केले जाते. उचके यांच्या अटकेनंतर 10 दिवसांनी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. याबाबतची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महापालिकेकडे अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे निलंबनाची कारवाई होऊ शकली नाही. प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे राजनांदगाव पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून अटकेबाबत माहिती मागविण्यात आली. पोलिसांकडून अधिकृत माहितीचे पत्र मिळाल्यानंतर सोमवारी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. उचके यांच्या जागी उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी.चंदनखेडे यांच्याकडे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.