नागपूर: घर आणि कार्यालयीन व्यस्ततेमुळे नकळतपणे अनेकदा महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यावे, आणि तणावमुक्त राहाव्यात याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ( ता २६) रोजी नॉर्थ अंबाझरी रोड, गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय येथे मनपातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेकडो महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन मनपाच्या समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष डॉ. भावना सोनकुसळे, श्रीमती नूतन मोरे, डॉ. निमकर, डॉ. विभूती पाणबुडे, डॉ. रंजना देशपांडे, प्रा. अल्का शेवाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्तम कार्य केल्याबद्दल डॉ. रेणुका यावलकर, डॉ. सुषमा खंडागडे, डॉ. शालिनी रोडे यांचा सत्कार करण्यात आला. या निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिरात महिलांची आठ प्रकारची तपासणी करण्यात आली. यात HB Test, कोलेस्ट्रॉल तपासणी, Blood Sugar तपासणी, Kidney Function Test, Liver Function Test, Bone Marrow Density Test, Breast examination, Mammography for High Risk Group, PAP smear अशा तपासणीचा समावेश होता. आरोग्य तपासणी नंतर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अल्का शेवाळे यांनी केले.