नागपूर : शहरातील अजनी परिसरातील शताब्दी चौकात गुरुवारी बेधडकपणे चालविलेल्या टिप्परने एका व्यक्तीला चिरडून ठार केले तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अटकेच्या भीतीने टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
सेवक गणपत सावरकर (५५) असे मृताचे नाव असून, तो गुमथळा येथील रहिवासी होता. तर जखमी शेषराव बद्रे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. रात्री 9.30 च्या सुमारास सेवक सावरकर आणि त्यांचे मित्र शेषराव बद्रे पॅशन प्रो मोटरसायकलवरून (MH40/BM-2403) लग्नसमारंभासाठी जात असताना हा अपघात झाला. तेवढ्यात भरधाव वेगात आलेल्या टिप्परने त्यांना धडक दिली. सावरकर व बद्रे मोटारसायकलवरून पडले. सावरकर ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले तर बद्रे हे गंभीर जखमी झाले.
अजनी पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ), 279, 338, मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अ), 134 (ब), 184 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे.