नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने आता शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहे. गेल्या तीन दिवसांत नासुप्रच्या जागेवरील अतिक्रमित अशा एकूण ६५९ झोपड्या पाडण्यात आल्या. गुरुवारी आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करत एकाच दिवशी २८७ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
कोणतेही बांधकाम करताना नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र शहरातील अनेक भागात नियमांचे उल्लंघन करण्यात येते. यापार्श्वभूमीवर नासुप्रच्या पथकाने कारवाईचा सपाट लावला आहे. विनोबानगर येथील १२८ झोपड्या पाडल्यानंतर नासुप्रने यशोधरानगर परिसरात मोकळ्या भूखंडावर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या २४४ झोपड्या पाडल्या.
नागपूर शहर अतिक्रमण मुक्त करण्याच्या उद्देशाने नासुप्रने ही कारवाई केली आहे.
नासुप्रने अतिक्रमणविरोधी कारवाईचा विक्रम गुरुवारी करीत एकाच दिवशी २८७ झोपड्या जमीनदोस्त केल्या. मौजा वांजरी परिसरातील खसरा क्रमांक ३० ते ३५मधील शिवाजी चौक, टिपू सुलतान चौक, यशोधरानगर चौक, पवननगर, प्रवेशनगर, गरीब नवाजनगर या भागातील नासुप्रच्या मालकीच्या जागेवरील अवैध बांधकामावर ही कारवाई करण्यात आली. नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता एस. एम. पोहेकर, विभागीय अधिकारी कमलेश टेंभुर्णे, पोलिस निरीक्षक गोरख कुंभार (गुन्हे), नासुप्रचे नितीश शेंडे, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख मनोहर पाटील, साहाय्यक अभियंता फैजान अली, दिलीप केने यांच्या उपस्थित ही कारवाई करण्यात आली आहे.