नागपूर : शहरातील पंचशील नगरच्या मुख्य चौकातून गिट्टीखदान चौकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर गुंडाच्या टोळीची दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मनीष उर्फ लक्की गुरुपिल्ले( वय 24 वर्षे, रा. पंचशील नगर), आशिष मॉरीस विल्सन ( वय 26 वर्षे, रा -पंचशील नगर), संदीप मधुकर प्रसाद पासवान( वय 40 वर्षे, रा.
गवळीपुरा), मिथिलेश उर्फ बल्लू उर्फ लक्ष्मीप्रसाद यादव (वय 39 वर्षे, रा. गवळीपुरा, गिट्ठीखदान) ही आरोपींची नावे आहेत. तर इतर दोन आरोपी फरार झाले आहेत.
13 मे रोजी गुंडाच्या टोळीने सार्वजनिक ठिकाणी राडा करत रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच दुकादारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनाही आरोपींची मारहाण केल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने रस्त्यावरून पायी चालत जाणारे लोक सैरावैरा पळू लागले, आरोपींच्या दहशतीमुळे इतर दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली, आरोपींनी केलेले कृत्य हे दखलपात्र स्वरूपाचे व गंभीर असून आरोपीने केलेल्या कृत्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झाल्याने, त्यांचे विरुद्ध परिसरातील नागरिक तक्रार देण्यास घाबरत होते. त्यामुळे गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सचिन बाळासाहेब वाकलेकर( वय 32 वर्षे) यांनी फिर्यादी म्हणून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 342, 143, 147,149,323,506 भा.द. वि. सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम 07 सह गुन्हा दाखल केला आहे.