नागपूर : बुटीबोरीत शिक्षिकेने आपल्या राहत्या घरी स्वतःच्या १० वर्षाच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चेतना शिरीष भक्ते ( (३५) रा.ओम साई नगर दत्ता मेघे कॉलेज जवळ प्रभाग क्र.७ बुटीबोरी) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर हर्षिका शिरीष भक्ते (१०) असे चिमुकलीचे नाव आहे.
माहितीनुसार, बुटीबोरी पोलीस हद्दीतील प्रभाग ७ मधील ओम साई नगर,दत्ता मेघे कॉलेज जवळ २० मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. चेतना ही बुटीबोरी येथील एका खाजगी शाळेत ५ व्या वर्गाला शिक्षिका म्हणून कार्यरत असल्यामुळे ती बुटीबोरी येथील आपल्या आई वडिलांच्या घरी राहायची. घटनेच्या दिवशी वडिलांनी तिच्या खोलीचे दार ठोकले त्यावेळी दार आतून बंद होते.मागच्या बाजूला असलेल्या उघड्या दारातून आता प्रवेश केला असता चेतना ही आपल्या बेडवर कोणतीही हालचाल न करता पडून होती आणि तिच्या तोंडाला फेस होता.
तर हर्षिका चित्त अवस्थेत पडून होती. हे दृश्य पाहून वडिलांनी आरडाओरडा केला. हर्षिकाच्या तब्बेतीत बिघाड झाल्याचे बघून कुटुंबीयांनी तिला बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.दरम्यान चेतनाच्या खोलीत नोवाफिस ५६ नामक विषारी कीटकनाशक आढळून आले.
त्याचबरोबर एक सुसाईड नोट देखील मिळून आला.ज्यात तिला तिच्या कार्यरत असलेल्या शाळेत चोरीचा आड घेऊन मानसिक त्रास होत असल्याचे नमूद करण्यात आले. इकडे हर्षिका ची प्रकृती नाजूक झाल्याने तिचा सुद्धा मृत्यु झाला. चेतना हिने आपल्या चिमुकल्या मुलीला सुद्धा ते विषारी कीटकनाशक पाजले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी चेतनाचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता रवाना केले आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.