मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे आणि भाजप सरकार स्थिर असून दोन्ही पक्षाकडून लवकर मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार 2 जूनच्या सुमारास होईल, असे शिवसेना नेते भरत गोगावले यांनी मंगळवारी सांगितले. तसेच स्वतःला मंत्रिपद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला. गोगावले यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितले की, “आता सर्व अडथळे दूर झाल्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उपमुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर असताना अचानक शुक्रवारी रात्री दिल्ली दरबारी पोहोचले. रात्रीच्या बैठकीनंतर ते पुन्हा नागपुरात परतले आहेत. या घडामोडी आणि बैठकांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?
आमदार बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे नेते असून त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्याच आग्रहानुसार राज्यात नवीन दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर भरत गोगावले यांच्याकडे जलसंधारण विभागाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू आहे. मंत्री पदासाठी अतिशय उत्सुक असलेल्या औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिंदे गटातील इच्छुक नेत्यांची नावे -प्रताप सरनाईक, भरत गोगावले, गोगावलेराजेंद्र यड्रावकर, संजय शिरसाट , बालाजी किनीकर, सदा सरवणकर, अनिल बाबर, यामिनी जाधव, चिमणराव पाटील अशी इच्छुकांची नावे आहेत. भाजप पक्षातील इच्छुक नेत्यांची नावे – प्रवीण दरेकर, संजय कुटे, योगेश सागर, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, बच्चू कडू यांच्या नावांची चर्चा आहे.