नागपूर – लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून आहे. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी आतापासूनच पक्षाच्या नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय महासंपर्क अभियान राबवले जाणार आहे. मात्र भाजपच्या अभियानातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुरावले जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दिल्लीतील पक्षश्रेठींनी या अभियानाची धुरा फडणवीस यांना न देता त्यांचे विश्वासून भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांकडून हळूहळू निसटत जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची ताकद वाढवली. कालांतराने त्यांच्या चाणक्य नितीमुळे ते पक्षाचे ताकदवान नेते ठरले. मात्र २०१९ नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या राजकीय मतभेदानंतर फडणवीस यांना महाराष्ट्रातून भाजपाची सत्ता गमवावी लागली. यातच फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेला पहाटेच्या शपथविधीवरूनही फडणवीस प्रकाश झोतात आले.
त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यात शिंदे गट आणि भाजपाची सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेना फोडण्यात फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे फडणवीस यांना २०२४ च्या निवडणुकांपासून दूर खेचत बोलले जात आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांच्या खांद्यावर आतापर्यंत कोणतीच मोठी जबाबदरी सोपविली नाही.
दरम्यान महाराष्ट्र भाजपकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ३१ मे ते ३१ जून दरम्यान महा संपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करुन दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदार संघात विकास यात्रेचे आयोजन देखील प्रदेश भाजपकडून करण्यात आले आहे.