नागपूर: डॉ. सुनील मोतिराम लांजेवार यांना ठार मारण्याची धमकी देऊन ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. हर्षद नरेंद्र हटवार (३२) रा. मनीषनगर आणि शुभम संजय मडावी (२९) रा. तकिया, धंतोली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर असून दुसरा फायनान्स कंपनीसाठी वसुलीचे काम करतो. दोन्ही आरोपींची कोणतीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून झटपट पैसे कमावण्याच्या नादात आरोपींनी डॉक्टरला धमकवून खंडणी मागण्याचा प्लॅन आखला.
जनता चौकातील श्रीमान कॉम्प्लेक्समध्ये सुनील लांजेवार यांचे दादासाहेब लांजेवार रुग्णालय आहे. त्यांची पत्नी छाया सुनील लांजेवार (६४) या सुद्धा डॉक्टर आहेत. गत मंगळवारी आरोपींनी त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला होता. रुग्णालय चालवायचे असेल तर ४० लाख रुपये ‘वन टाईम प्रोटेक्शन मनी’ द्यावे लागेल. जर पैसे मिळाले नाही तर ठार मारले जाईल. इतकेच नाही तर पोलिसांकडे यासंदर्भात वाच्यता वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपींची लांजेवार यांना दिली.
लांजेवार यांनी पोलिसात तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून लांजेवार दाम्पत्याला सुरक्षा उपलब्ध केली. डीसीपी अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात खंडणी विरोधी पथकाने आरोपींचा शोध घेतला.
दोन्ही आरोपी जनता चौकातील एका पानठेल्यावर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून दोघांनाही अटक केली. दोन्ही आरोपींची इंटरेनेवरून डॉक्टरांचे संपर्क क्रमांक मिळविले होते. आतापर्यंत त्यांनी ३ डॉक्टरांना फोन करून धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक निरीक्षक इश्वर जगदाळे, संतोष जाधव, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, विजय नेमाडे, चेतन जाधव, नितीन वासने, चंद्रशेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर, मिथुन नाइक, पराग ढोक, पुरुषोत्तम नाइक, प्रशांत भोयर आणि रमन खैरे यांनी केली.