नागपूर : शहरातील दोन तरुण गिर्यारोहक यश शर्मा व दक्ष खंते यांनी १३ हजार ८०० फूट उंचीचे ‘पठालसू’ शिखर सर करत नागपूरकरांची मान उंचावली.
सोलांग व्हॅलीपासून आठ किलोमीटर अंतरावर आणि मनालीपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले पठालसू शिखर हे हिमाचल प्रदेशच्या कुल्लू व्हॅलीमध्ये आहे. हे सर्वात उंच शिखरांपैकी एक शिखर आहे. हे शिखर सर करतांना यश शर्मा व दक्ष खंते यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हे शिखर चढताना दाट पाइन वृक्षांचे जंगल, गवताळ कुरणे, बर्फाच्छादित भूप्रदेश आणि लँडस्केपसारखा मार्ग चढवा लागतो.
यश शर्मा हे एक निपूण एन्डयुरन्स प्रशिक्षक आणि प्रसिद्ध सायकलपटू असून त्यांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आहे. तर दक्ष खंते हा सोमलवार निकालस हायस्कूलचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून ‘टायगर मॅन ट्रायथ्लॉन’चा विजेता देखील आहे. त्यानेही नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. सीएसी ऑलराउंडर अॅडव्हेंचर क्लबचे ज्येष्ठ गिर्यारोहक अजय गायकवाड आणि एव्हरेस्टर प्रणव बांडेबुचे यांचे या मोहिमेदरम्यान दोन्ही गिर्यारोहकांना मार्गदर्शन केले.
दरम्यान सात दशकांपूर्वी २९ मे रोजी भारतातील माऊंट एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर करण्यात आले. शेर्पा तेन्सिंग नोर्गे व सर एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर सर केले होते. ही सप्तदशकपूर्ती साजरी करण्यासाठी गिर्यारोहक यश शर्मा व दक्ष खंते ‘पठालसू’ शिखर सर करण्याचा निर्णय घेतला.