नागपूर: आयआयटी, व्हीएनआयटीसारख्या इंजिनीयरींग कॉलेजमध्ये तांत्रिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांमध्येदेखील कलागुण असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व या युवाप्रतिभांना प्रबोधन, प्रशिक्षण व संस्कार देण्याचे उल्लेखनीय कार्य स्पिक मॅके करत आहे, असे कौतुकोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा ‘आझादी का अमृत महोत्सव’, जी20 इंडिया आणि स्पिक मॅके यांच्या संयुक्तवतीने व्हीएनआयटीमध्ये सुरू असलेल्या 8 व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी मंचावर व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे व स्पिक मॅकेचे राष्ट्रीय अध्यक्ष राधा मोहन तिवारी यांची उपस्थिती होती.
नितीन गडकरी म्हणाले, वैविध्यपूर्ण भाषा, संस्कृती,राहणीमान यामुळे आपला भारत जगातील इतर देशांपेक्षा वेगळा आहे. ‘अनेकता में एकता’ हीच आपली विशेषता आहे. भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत, नृत्य, नाट्य, योग याचे जगातील लोकांमध्ये आकर्षण आहे. याचे श्रेय या क्षेत्रात अनेक वर्षांपासून तपश्चर्या करीत असलेल्या गुरूंना जाते. आपल्याकडे असलेल्या गुरुकुल परंपरेमुळे शिष्य गुरूच्या घरी जाऊन अतिशय श्रद्धेने त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन ग्रहण करतो आणि सराव करतो.
त्यामुळे त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते. जगात लाखो योग शिक्षक, संगीत शिक्षकांची आवश्यकता असून संगीताचा आराधना करताना युवकांना रोजगार पण दिला जाऊ शकतो, असे सांगताना नितीन गडकरी यांनी योगाचा जसा शरीर, मनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो तसाच तो संगीतामुळेदेखील घडून येतो. पण या क्षेत्रात पाहिजे तसे संशोधन झाले नाही, अशी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद पडोळे यांनी केले तर राधा मोहन तिवारी यांनी व्हीएनआयटी परिसरासारखा अतिशय सुंदर आश्रमासारखा परिसर अधिवेशनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. पडोळे यांचे आभार मानले.