नागपूर : ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगार प्लॅटफॉर्म महादेव अॅपच्या संचालकांनी कथितरित्या भाड्याने घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचा संशय असलेल्या दोन व्यक्तींना नागपूर रेल्वे स्थानकात अटक करण्यात आली.
अनुज तिवारी आणि रजनीश पांडे यांना शनिवारी मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या क्राइम इंटेलिजन्स ब्युरो (CIB) ने अटक केली होती. पोलिसांनी या आरोपींना पकडण्यात सापळा रचला होता. या आरोपींचा पाठलाग करताना त्यांच्यासोबत झालेल्या हाणामारीत दोन पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाले.
छत्तीसगडमधील भिलाई येथे ओमप्रकाश साहू यांच्या हत्येला तिवारी आणि पांडे जबाबदार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान महादेव अॅपवर सट्टेबाजी करताना साहूचे मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. साहूने ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी स्थानिक ऑपरेटर म्हणूनही काम केले होते. साहू ३० लाखांचे कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरल्याने दुबईस्थित अॅप ऑपरेटर्सनी अनुज आणि रजनीश यांना मारण्यासाठी नियुक्त केले.
अहवालानुसार, आधी अटक करण्यात आलेल्या आशिष तिवारी नावाच्या अन्य एका व्यक्तीसह दोन आरोपींनी साहूला 31 मे रोजी एका पार्टीसाठी आमंत्रित केले होते. साहू दारूच्या नशेत असताना तिवारी आणि पांडे यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी साहूचा मृतदेह त्याच्या दुचाकीला बांधून त्याची एका खदानीत विल्हेवाट लावल्या गेली. अटकेनंतर अनुज तिवारीने छत्तीसगड पोलिसांना हत्येची माहिती दिली. ट्रेनमधील त्यांचे स्थान ट्रॅक केल्यानंतर आयुक्त पांडे यांनी सीआयबी आरपीएफचे प्रमुख नवीन प्रताप सिंग यांना संशयितांना पकडण्याचे काम सोपवले.
गेल्या महिन्यात नागपुरात महादेव अॅपवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यात दुसऱ्या दिवशी त्याच्या आईनेही आपले जीवन संपविले होते. तथापि, आतापर्यंत या घटनांसंदर्भात कोणताही अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.