नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे रुळाजवळ मंगळवारी श्रीलंकन नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला . एका मेंढपाळाने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने नियंत्रण कक्षाला कळविले.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेहाची झडती घेतली, त्यांना अरुणासलम शिवराजा नावाचा श्रीलंकेचा पासपोर्ट सापडला. मानकापूर परिसरात रेल्वे रुळालगतच्या ढिगाऱ्यात मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मेंढपाळाला मृतदेह दिसला आणि त्यांनी मानकापूर पोलिसांना खबर दिली.
पोलिसांनी केलेल्या सविस्तर चौकशीत असे दिसून आले की अरुणासलम चेन्नई विमानतळावर २१ मे रोजी आला होता. चेन्नई येथे तो उत्तर भारतात जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला होता. मृतदेहाची स्थिती पाहता सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.