नागपूर : दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. यापार्श्वभूमीवर आजपासून नागपूर पोलिसांकडून एकूण 2,700 किलो जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत आज १२०० किलोचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. हा पारडी परिसरातून जप्त करण्यात आलेला गांजाचा साठा होता.
नागपूर पोलिसांनी या महिन्याच्या सुरुवातीला “ऑपरेशन नार्कोप्स” ही मोहीम सुरु करण्यात आली. या अनुषंगाने नागपूरला अंमली पदार्थमुक्त शहर बनवण्यासाठी अमितेश कुमार थेट जनतेला पोलिसांना मदत करण्याचे आवाहन अमितेश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.
शहरातील 653 ठिकाणे एकेकाळी अंमली पदार्थांचे व्यसनी आणि तस्करांसाठी सुरक्षित क्षेत्र मानली जात होती. चालू असलेल्या ऑपरेशनमध्ये 200 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत . याचदरम्यान असुरक्षित भागातून 2.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एका स्थानिक इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे की 200 प्रकरणांपैकी 126 व्यसनाधीनांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.आतापर्यंत पोलिसांनी व्यापार्यांवर आणि व्यसनाधीनांवर केलेल्या कारवाईमुळे सुमारे 256 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात अंमली पदार्थ आणि निषिद्ध पदार्थांच्या सेवनासाठी 156 जणांचा समावेश आहे. विशेषतः, 15 जूनपर्यंत मेफेड्रोन बाळगल्याबद्दल 24 प्रकरणांमध्ये 39 पेडलर्सना अटक करण्यात आली.
शिवाय, 8 जूनपर्यंत गांजा बाळगल्याबद्दल 47 प्रकरणांमध्ये 55 लोकांना अटक करण्यात आली.
आकडेवारीनुसार, नागपूर पोलिसांनी 15 जूनपर्यंत सुमारे 400 लोकांची छाननी केली आहे, या सर्वांच्या आधीच्या नोंदी अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवनाशी संबंधित होत्या. पोलिसांनी शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू बंदीची कडक अंमलबजावणी केली आहे. परिणामी, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तंबाखू आणि सिगारेट विक्रीसाठी 168 गुन्हे दाखल करण्यात आले असून, बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल मे महिन्यात सुमारे 15 पान दुकाने बंद करण्यात आली आहेत.