मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
समृद्धी महामार्गावर झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्यात येईल. तसेच राज्य सरकारकडून अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.
दरम्यान नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.