नागपूर : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलच्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातात बसने पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. या अपघातावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अपघातावरून शिंदे सरकारला फटकारले आहे.
बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केले.