मुंबई : कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मिरविणाऱ्या तोतया व्यक्तीचा अखेर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या तोतया न्यायाधीशाने स्वतःसाठी पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. तसेच तो अनेक कार्यक्रमातही हजेरी लावायचा . पण त्याच्या अतिउत्साहीपणामुळे तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भासवणाऱ्या या व्यक्तीला महाराष्ट्रातील लातूर येथे अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश म्हणून भासवणाऱ्या या व्यक्तीने 28 जून रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फोन करून एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाहनाची मागणी केली होती, असे निरीक्षक संजीवन मिरकळे यांनी सांगितले.
त्याला एक पोलिस वाहन आणि एक गार्ड देण्यात आला होता. त्या दिवशी अहमदपूरच्या शिवनखेडमधील विविध कार्यक्रमांना तो उपस्थित होता. न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला होता,” असे निरीक्षक म्हणाले.
या कार्यक्रमातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलिस अधिकार्यांना काहीतरी गडबड दिसली. तपासात तो माणूस नकली न्यायाधीश असल्याचे सिद्ध झाले.भारतीय नगर येथील मीर अली युसूफ अली सय्यद (३२) याला शनिवारी अटक करण्यात आली. तो ५ जून रोजी बदली झालेल्या न्यायाधीश म्हणून काम करत होता . फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोपाखाली त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.