मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे. जवळपास तासभर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गट आणि भाजप आमदारांमधील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये नंदनवन बंगल्यावर बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार भाजप आणि शिंदे सत्तेत सहभागी झाले. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती हे राष्ट्रवादीच्या वाटेला जातील, अशी शिवसेना आमदारांची तक्रार असल्याची चर्चा आहे.
तसेच अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी निधी न देण्याच्या कारणास्तव महाविकास आघाडी सरकारमधून आमदार बाहेर पडले. पण आता अजित पवार शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे अजित पवार यांना आमदारांचा विरोध केला. तसेच भाजपच्या आमदारांमध्येही याच कारणावरून अस्वस्थता पसरली आहे.