नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार महायुतीत एन्ट्री केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज्य सरकारमध्ये अजितदादांनी अचानक झालेल्या एन्ट्रीने शिंदे गटातील नेत्यांची धाकधुक वाढली आहे.
महाविकास आघाडीत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दुय्यम वागणूक देतात. अशी टीका करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी शिवसेतून बंडखोरी केली. त्यावेळी अनेकांना आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांना मंत्रीपद मिळाले. यानंतर इतर आमदारांना दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. हे आमदार गेल्या वर्षभरापासून मंत्रपदाची वाट पाहत होते.
अशात अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने तसंच अजित पवारांसह ९ जणांना मंत्रीपद मिळाल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे नाराज आमदारांची समजूत काढण्याचे मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे. इतकेच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठीही शिंदे यांनी महायुतीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाहता येत्या काळात काय घडामोडी घडतात त्यांचीही चिंता शिंदेंना आहे.