मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी फूट पाडत शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार गटात सत्तासंघर्ष पेटला आहे.
पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.येत्या तीन आठवड्यांत पक्षांसदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांना ही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिल्याची माहिती आहे. शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला.
शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आलेल्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाला आमचे उत्तर हवे आहे. आम्ही विहित कालावधित आमचे उत्तर निवडणूक आयोगाला देऊ, असे ते वरिष्ठ नेते म्हणाले.
अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यातील पक्षांतर्गत वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचल्याने राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.