नवी दिल्ली : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात अद्यापही सत्तासंघर्ष सुरूच आहे. शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्यालाच मिळायला हवं, असा दावा केला. हे प्रकरण पुढे निवडणूक आयोगाकडे गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी केली. राज्यात त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा वाद पेटला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.