नागपूर : शहरातील भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांची जबलपूरमध्ये हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. .सना हीचा मित्र अमित साहूने तिचा खून केल्याची संशय पोलिसांना असून या प्रकरणातील प्रमुख संशयित अमित साहूच्या ढाब्यात काम करणाऱ्या कामगाराची चौकशी केली.
ज्याने अधिकाऱ्यांना सांगितले की साहूने जबलपूरहून निघण्यापूर्वी त्याची कार धुण्यास सांगितले होते. साफसफाई दरम्यान, कामगाराला काही कपड्यांसह कारमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. साहूने जबलपूरमधून पळून जाण्यापूर्वी आधार कार्ड वापरून सिमकार्ड मिळवले होते, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली. आरोपी साहूनेच खानची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याची पोलिसांना आता खात्री झाली आहे.
मानकापूर पोलिसांनी भाजप नेत्याची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक जबलपूरला रवाना झाले आहे. पोलिसांना अद्यापही सना यांचा मृतदेह मिळाला नाही. साहूने सनाची हत्या करून तिचा मृतदेह धरणात किंवा नर्मदा नदीत टाकला असावा, असा पोलिसांना संशय आहे. अधिकाऱ्यांनी बरघी धरणातही शोध घेतला, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपाच्या नेत्या आहे. त्यांनी युवा मोर्चासाठी काम केले. सना यांचा मित्र अमित साहू हा जबलपूरला असून त्याची सना खान यांच्याशी मैत्री आहे. या दोघांनी मिळून जबलपूरमध्ये ढाबा टाकला. त्यानंतर सना यांचे जबलपूरला जाणेयेणे असायचे. १ ऑगस्टला सना खान या स्वत: जबलपूरला गेल्या.
अमितची भेट घेतली. २ऑगस्टला सना यांनी घरी फोन करून सायंकाळपर्यंत घरी येणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच दिवशी अमितच्या घरातून सना यांच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. या प्रकारानंतर २ ऑगस्टच्या दुपारपासून सना या बेपत्ता आहेत. सना यांचा मोबाईलही बंद आहे. तिच्या कुटुंबियांनी मानकापूर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दिली. यातच तिचा मित्र अमित साहूही गायब आहे. तसेच ढाब्यात काम करणारे कर्मचारीही गायब झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
मानकापूर पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी सांगितले की, आम्ही तक्रारीच्या आधारे बेपत्ता व्यक्तीची नोंद केली आहे. आमची टीम जबलपूरला रवाना झाली आहे; मात्र, सना सध्या सापडत नाही. तिच्या मृत्यूचे कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे तिची हत्या झाली कि नाही हे सांगता येणार नाही.