नागपूर-पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कोणत्याही परिसरात सुरू असलेल्या सट्टा-जुगार किंवा अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई
करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते.
मात्र प्रत्यक्षात गुन्हे थांबविण्याची जबाबदारी असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट चौकीत खुलेआम जुगार खेळल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.आज दुपारी १२ वाजल्यापासून चौकीच्या मागील भागात बांधलेल्या टीन शेडखाली तीन पोलिस कर्मचारी टेबलावर पत्ते खेळू लागले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांची प्रतिमा पुन्हा मलीन झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
आनंद, फिरोज आणि रवी अशी पत्ते खेळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शेजारी असलेल्या दुसऱ्या टेबलासमोर बसलेले दोन कर्मचारी मोबाइल बघण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनाही पाठवण्यात आला. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तत्पूर्वी पोलिस चौकीत बसून पोलिस कर्मचारी जुगार खेळत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई जाईल, असे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले होते.