मुंबई : भारत छोडो आंदोलनाच्या स्मरणदिनी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मला सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. कारण मी ९ ऑगस्ट भारत छोडो दिनाच्या स्मरणार्थ घरातून निघालो होतो. मला अभिमान आहे माझे आजोबा बापू आणि बा (आजी) यांनाही ऐतिहासिक तारखेला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती, असे तुषार गांधी म्हणाले.
तुषार गांधी संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. ट्विटरवर युजरला उत्तर देताना तुषारने सांगितले की,ऑगस्ट क्रांती मैदानावर शांततापूर्ण मोर्चाची तयारी होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान म्हणून याकडे पाहिले जात आहे. तुषार गांधी यांना त्याच्या समर्थकांसह ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा येथे राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेतही तुषार गांधी दिसले होते. तुषारचे पूर्ण नाव तुषार अरुण गांधी आहे. त्यांचे वडील पत्रकार अरुण मणिलाल गांधी होते. गांधीजींचे पुत्र मणिलाल गांधी यांचे ते नातू आहेत. त्यांनी गुजरातमधील वडोदरा येथे महात्मा गांधी फाउंडेशनची स्थापना केली आहे. ते सध्या आपल्या कुटूंबीयांसोबत मुंबईत वास्तव्यास आहेत . दरम्यान तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्यामुळे विरोधक चांगलेच भडकले आहे.