नागपूर : गोंदिया – कोहमारा हायवेमधील मुर्दोली परिसरात काल रात्री नार १०-१०:३० च्या दरम्यान क्रेटा कारच्या धडकेत एक वाघ गंभीर जखमी झाला. जखमी वाघाला उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाघ हा नागझिरातील टी १४ वाघिणीचा दोन वर्षांचा बछडा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्घटनेत वाघ जखमी झाल्याची माहिती मिळताच आज सकाळी पाच वाजतापासून त्याला रेस्क्यू करण्याचे अभियान सुरू झाले. सकाळी ७:३० ला वाघाला पकडण्यात आले. वाघाला इतकी दुखापत झाली होती की त्याच्या पूर्ण हालचाली बंद झाल्या होत्या. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. या वाघाचे शवविच्छेदन आणि प्रक्रिया नागपूर गोरेवाडा येथे आज दुपारून होणार आहे.
दरम्यान या वाघाला रेस्क्यू करण्यात वनविभागाचे उपवसंरक्षक प्रमोद पांचभाई , विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वन परिक्षेत्र अधिकारी रवी भगत, जलद बचाव पथक- नवेगावचे चमू हे सहभागी झाले होते.