मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते आहे. सोबतच ते आपल्या हजरजबाबी उत्तरामुळे ओळखले जातात. भारतातील आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेच्या (आयएए) वतीने मुंबईत आयोजित आयएए लीडरशीप पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान फडणवीसांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले.
एक गाडी महात्मा गांधी चालवत आहेत, तर दुसरी गाडी वीर सावरकर चालवत आहेत, तुम्ही कुठल्या गाडीत बसाल?’ असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, मला स्वतः ड्राईव्ह करायला आवडेल. मी त्यांना विचारेन, की मी गाडी चालवत असताना जो कोणी माझ्या गाडीत बसायला तयार असेल. त्याचे स्वागतच आहे, फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात सर्व टाळ्यांचा कडकडाट झाला.
तसेच या कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांच्यासोबत एक राजकीय रॅपिड फायर राऊंडही खेळण्यात आला. यादरम्यान त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तर द्यायचे होते.
कोणत्या पक्षासोबत तुम्ही कधीच युती करणार नाही? यावर फडणवीस यांनी काँग्रेसचे नाव घेतले.
काँग्रेस नेत्यांव्यतिरिक्त कोणाशी तुम्ही कधीच युती करणार नाही?
यावर फडणवीस म्हणाले की, राजकारणात आम्ही शत्रू कधीच नसतो, तर एकमेकांचे राजकीय विरोधक असतो. आम्ही काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात आहोत. त्यामुळे जो नेता काँग्रेसच्या विचारधारेशी चिकटून राहील, त्याच्याशी कधीच युती करणार नाही, असे सडेतोड उत्तर फडणवीस यांनी दिले.
महायुतीत नसलेला आणि इतर पक्ष असलेल्या कोणत्या नेत्याचे तुम्हाला कौतुक वाटते?
यावर फडणवीस म्हणाले की , असे अनेक नेते आहेत, पण राजकारणात तुम्ही हे उघडपणे सांगू शकत नाही. कारण जर तुम्ही म्हणालात की, या पक्षातील हा नेता मला चांगला वाटतो, तर लगेच तेवढ्या भागाचा व्हिडिओ कापून पसरवला जातो, आणि मग ते म्हणतात, की बघा श्रीयुत देवेंद्र फडणवीस हे माझं किंवा आमच्या नेत्याचं किंवा आमच्या पक्षाचे कौतुक करत आहेत. त्यामुळे तुम्ही मला खाजगीत भेटल्यावर त्या गप्पांमध्ये मी तुम्हाला तीन नेत्यांची नावे नक्कीच सांगणार असल्याचे फडणवीस म्हणाले.