गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. बदललेल्या परिस्थितीत सरकार चालविण्याची जबाबदार देवेंद्र फडणवीस यांनी पेलली तर प्रदेश भाजपची संघटना चालविण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली. बावनकुळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा…
कुठल्याही राजकीय पक्षाच्या यशाचे मोजमाप तीन निकषांवर केले जाते. पक्षातील अंतर्गत लोकशाहीची स्थिती काय आहे? पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचविण्यात यश आले का? आणि सत्तेवर आल्यावर पक्षाने कसे काम केले? या तीनही निकषांच्या आधारे पक्षाचे मूल्यमापन करायचे असेल, तर त्या पक्षाच्या अध्यक्षांची कामगिरी महत्त्वाची ठरते. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या कारकिर्दीकडे पाहाता येईल
पक्षांतर्गत लोकशाहीची स्थिती
आपल्या घटनाकारांनी खूप विचारपूर्वक देशात बहुपक्षीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. या व्यवस्थेत राजकीय पक्षांची विशेषतः सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अन्य राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीवर राजकीय घराणेशाहीची छाया आहे. महाराष्ट्र भाजपमधील पक्षांतर्गत लोकशाही टिकविण्याची जबाबदारी बावनकुळेंवर होती. पक्षाच्या घटनेनुसार लोकशाही मार्गाने त्यांनी अनेक नियुक्त्या, फेरनियुक्त्या केल्या. त्या करीत असताना जात, धर्म, पंथ, स्त्री – पुरुष, जुने-नवे यांचा समतोल राखत सर्व घटकांना संघटनेत काम करण्याची संधी मिळेल याची काळजी घेतली. युवा ही राष्ट्राची ताकद असून, आजचे युवकच भारताला महासत्ता बनवू शकतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्या आधारे जास्तीत जास्त युवकांना पक्षात जबाबदार्या दिल्या. पक्षांतर्गत नियुक्त्यांमध्ये कार्यकर्त्यांचे सरासरी वय ४० इतके आहे. केवळ पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करून बावनकुळे थांबले नाहीत, तर जिल्हा, मंडल, प्रभाग स्तरापासून शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य अशा शेवटच्या स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली. त्याशिवाय पक्षाचे विविध मोर्चे, आघाड्या, प्रकोष्ठ यांच्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या लोकशाही पद्धतीने पूर्ण केल्या.
पक्षाची विचारधारा पोहोचवणे
पक्षाचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बावनकुळेंनी अथक प्रयत्न केले. जिल्ह्या-जिल्ह्यात त्यांचा झंझावाती दौरा सुरूच होता. पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी, अफाट लोकसंपर्क, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड, सामान्य कार्यकर्त्याबद्दल आस्था, पक्षवाढीसाठी अहोरात्र कष्ट करण्याची जिद्द, आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाने कार्यकर्त्याला आपलेसे करायची हातोटी आणि वैदर्भिय शैलीत साधलेला संवाद या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांचे जाळे विकसित केले. स्वतःचे सर्वस्व पणाला लावून पक्षासाठी लढण्याची त्यांची भावना कार्यकर्त्याला प्रेरक ठरते. बावनकुळेंशी संवाद साधणार्या कार्यकर्त्याला त्यांचे व्यक्तिमत्व वर्षानुवर्षाच्या मित्रासारखे वाटते, यातच त्यांचा स्वभावातला गोडवा जाणवतो.
परंतु गोड स्वभावाचा हा माणूस संघटनेच्या कामासाठी कर्तव्यकठोर आहे. बावनकुळेंनी केवळ पदांचे वाटप केले नाही, तर जबाबदार्या निश्चित केल्या, त्याचा सातत्याने आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देत कार्यप्रवण केले. महासंपर्क अभियान, हर घर तिरंगा, लाभार्थी संपर्क, बूथ यंत्रणा सक्षमीकरण, मोदी सरकारची नऊ वर्षे, केंद्र व राज्याच्या विविध योजना शेवटच्या स्तरावरील व्यक्तिपर्यंत पोहोचविणे, मतदार नोंदणी, महाविजय २०२४, सेवा उपक‘म अशा विविध अभियानांच्या माध्यमातून बावनकुळेंनी भाजप राज्याच्या कानाकोपर्यात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवला.
‘टिफिन बैठक’ हा बावनकुळे यांनी सुरू केलेल्या उपक‘माची राज्यभर जोरदार चर्चा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्था होती. या व्यवस्थेत घरातील लहान-थोर एकत्र पंगतीने जेवायला बसायचे. त्यावेळी दिवसभरात घडलेल्या गोष्टींवर कुटुंबात चर्चा व्हायची. या चर्चेतून घरातील वडीलधार्यांचे मुलांना मार्गदर्शन मिळायचे. आपल्याला काय हवे नको हे कुटुंब प्रमुखापर्यंत पोहोचविण्याची संधी या पंगतीतून मिळत होती. या उपक‘मातून आपलेपणाची भावना घट्ट होऊन, हलक्या फुलक्या वातावरणामुळे ताणतणाव कमी व्हायचे. याच पद्धतीने टिफिन बैठकीत घरून आणलेल्या डब्यातील जेवणाचा आनंद सर्व जण घेत आहेत. त्यामुळे जातीपातीच्या भिंती कोलमडून पडल्या असून, नेते व कार्यकर्त्यांमधील अंतर कमी होत आहे. कार्यकर्त्यांना आपली मते नेत्यांपर्यंत आणि नेत्यांना पक्षाचे विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरत आहे.
सत्तेत आल्यावर पक्षाचे कामगिरी
सरकारला पक्षाचे भरभक्कम पाठबळ असले की विकासकामांना वेग येतो, कारभार गतीमान आणि पारदर्शक होतो, सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहाचवता येते. एका अर्थाने पक्षाचा कार्यकर्ता हाच शासन आणि जनतेतील महत्त्वाचा दुवा बनतो. मु‘यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एका वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे चौदा हजारांपेक्षा अधिक शासन निर्णय घेतले.
महाविकास आघाडीच्या पहिल्या वर्षाच्या निर्णयांच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. मेट्रो, समृद्धी मार्ग, रस्ते विकास, पाणीपुरवठा, औद्योगिक गुंतवणुक अशा पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबर शेतकर्यांना मदत, नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना अनुदान, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, इंधनावरील मूल्यवर्धित करात सवलत असे लोकोपयोगी धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. वेगवेगळ्या आपत्तींमध्ये सरकार बरोबर पक्षाचे कार्यकर्तेही मदतीसाठी धावून गेले. सरकार आणि संघटनेत योग्य समन्वय असल्यावर विकास गतीमान होतो हेच बावनकुळेंच्या नेतृत्वाने दाखवून दिले. शिवाय सरकार किंवा संघटनेला विरोध करताना विरोधी पक्षांनी केलेली शिवराळ वक्तव्ये ही अभ्यासू वृत्तीने आणि संयमी पद्धतीने परतवून लावली.
अशाप्रकारे पक्षांतर्गत लोकशाही, पक्षाची सैध्दांतिक विचारधारा आणि सत्तेत आल्यानंतर सरकार आणि संघटनेने केलेले काम या त्रिसूत्रीच्या आधारे बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला गेल्या एक वर्षात यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेत भाजप आणि सरकारबद्दल प्रचंड विश्वास आणि प्रेम निर्माण झाल्याचे दिसून येते. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वगुरू बनवायचे आहे. भारतीय प्राचीन संस्कृती आणि मूल्यांकडून प्रेरणा घेत आधुनिक आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. ‘अखंड मानवतावाद’ या तत्त्वज्ञानानुसार शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकापर्यंत विकास गंगा पोहोचण्यासाठी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरेल असा दृढ विश्वास वाटतो.