Published On : Fri, Aug 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भाजपाच्या लोकसभा प्रवासाचा शुभारंभ विदर्भातून

• २० ऑगस्टला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ| • 'घर चलो' अभियान, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यव्यापी लोकसभा प्रवासाचा शुभारंभ विदर्भातून करणार आहेत. २० ऑगस्टपासून सुरू होणारा त्यांच्या दौऱ्याची सुरुवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून करतील. पहिल्या टप्प्यात ते २८ लोकसभा मतदारसंघाचा प्रवास करणार आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्त्वात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० तर लोकसभा मतदारसंघात ६०० कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असून एका महिन्यात हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. घरोघरी जाऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३० ते ५० हजार नागरिकांची पक्षाच्या ‘सरल अ‍ॅप’ मध्ये नोंदणी करून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहिती थेट पोहचविणे, नवमतदारांची नोंदणी करणे ही कामेही या अभियानात केली जातील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

या अभियानाचे नियोजन व तयारी स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष, लोकसभा संयोजक, लोकसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करणार आहेत. लोकसभा प्रवासांतर्गत पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद, प्रतिष्ठित व्यक्तिंच्या घरी भेटी यासह इतर संघटनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.