नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमरावती रोडलगतच्या वडधामनाजवळील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर छापेमारी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
अमरावती रोडवर असलेल्या अॅटमॉस्फियर आणि ग्रीन गार्डन सारख्या हॉटेल्समध्ये कथितरित्या दारू आणि हुक्का दिला जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाची पथकाने या हॉटेल्सवर धाड टाकली.
उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी आज ‘नागपूर टुडे’शी बोलताना सांगितले. नागपूरात नियमांचे उल्लंघन करून विविध रोडवरील काही हॉटेल्स आणि ढाब्यांवर अवैधरित्या दारू विक्री आणि हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली. त्यांनतर आम्ही तत्काळ कारवाई केली आहे. आमची टीम सध्या साइटवर आहे. मी छाप्याबद्दल अधिक तपशीलांची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान नागपुरात हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांविरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू आहे. 23 ऑगस्टच्या रात्री विभागाने 7 ढाब्यांवर कारवाई केली. त्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या हॉटेल्समध्ये दारूचे सेवन करणाऱ्या 18 ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली होती.