मुंबई : काँग्रेस सोशल मीडिया आघाडीने मुंबई काँग्रेस कार्यालय टिळक भवनात भारतरत्न सोशल मीडिया सेंटर स्थापन केले आहे. त्याचे उद्घाटन आज शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राहुल गांधी यांनी सोशल मीडिया वॉर रूमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सोशल मीडिया टीम भाजपच्या आक्रमक प्रोपगंडाविरोधात जनजागृती करीत आहे. त्यामध्ये सोशल मीडिया टीमने काँग्रेस टिळक भवनात भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरची स्थापना केली आहे. या सोशल मीडिया केंद्रात स्टुडिओ तयार करण्यात आलेला आहे. तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेरअयुक्त उपकरणे लावण्यात आली आहेत. या सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता अत्यंत कुशल अशी तंत्रज्ञानस्नेही सोशल मीडिया टीम सज्ज करण्यात आलेली आहे. त्या केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्किार्जुन खर्गे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीचे समन्वयक व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदी उपस्थित होते. हे सर्व नेते भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. राहुल गांधी व खर्गे यांनी या केंद्राची पाहणी केली. त्यांनी सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी तयार केलेल्या सोशल मीडिया यंत्रणेचे कौतुक केले.