नागपूर. शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणात तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला आरोपींनी मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी मंगळवारी न्या. विनय जोशी व न्या. वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. तसेच राज्य सरकारला नोटीस बजावत यावर उत्तर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. ए. एस. मनोहर तर राज्य सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू असे जन्मठेप झालेल्या याचिकाकर्त्यां आरोपींची नावे आहेत.
17 फेब्रुवारी 2018 रोजी आजी उषा होती हुडकेश्वर परिसरात कांबळे आणि दीड वर्षाची नात राशीची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश शाहू व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेली नात राशीचीही हत्या करण्यात आली होती. दोघींचेही मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले होते. याप्रकरणी 14 जुलै 2023 रोजी न्यायाधीश एस. बी. गावंडे यांनी कांबळे दुहेरी हत्याकांडात गणेश, अंकित व गुडीया या आरोपींना दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. घटनेच्या दरम्यान विधिसंघर्ष असलेल्या बालकाला तीन वर्षे कारावास ठोठावला होता. या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात वाजू मांडली होती. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर या निर्णयाचे अॅड. निकम यांनी स्वागत केले होते.