नागपूर : शहरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ५८ कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपी सोंटू जैनला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सोंटू जैनची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, सोंटूने त्याच्या दुबई लिंकवर अद्यापही कोणतीच माहिती पोलिसांना दिलेली नाही. त्याने चौकशीदरम्यान काही बुकींची माहिती दिली आहे. मात्र, त्याच्या माहितीवर पोलिसांना फारसा विश्वास नसून सोंटू त्यांची दिशाभूल करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नागपुरातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनविरोधात जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लगेच तो दुबईला पळून गेला. त्याच्या नागपुरातील लॉकर्समधूनदेखील साडेचार कोटींचे दागिने जप्त केले होते. सोंटूने अटक टाळण्याचे खूप प्रयत्न केले व तो न्यायालयात देखील गेला.
मात्र न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. अखेर सोंटू जैनला नागपुरात यावेच लागले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी सोंटूची कसून चौकशी केली असता त्याने काही बुकी व लिंक्सबाबत माहिती दिली. गुजरातमधील काही बुकींची नावेदेखील समोर आल्याची माहिती आहे. मात्र, दुबईत त्याच्या नेमक्या काय लिंक्स आहेत व या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे, यासंदर्भात त्याने चुप्पी साधली आहे.