नागपूर : शहरातील बेसा परिसरात घरकामाच्या नावाखाली ११ वर्षीय चिमुकलीचा अमानुष छळ आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास नियमांनुसार महिला अधिकाऱ्याकडे देण्यात न आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
त्यानंतर लगेच गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत. आता याप्रकरणी महिला सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या नूतन रेवतकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त अश्विनी दोरजे यांना दिले.
चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. यामध्ये सह पोलीस आयुक्त मॅडम यांनी स्वतः जातीने लक्ष घालावे, तसेच शासनातर्फे तज्ञ अशा महिला विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करण्यात यावी. प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, जेणेकरून गरीब मुलींच्या खरेदी विक्रीला लगाम बसेल. तसेच आरोपींना कडक शिक्षा होईल व गरीब पीडित मुलीला न्याय मिळेल.
इतकेच माजी तर पीडित मुलीच्या संगोपणापासून तर उच्च शिक्षणापर्यंतची, यानंतर सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने तिला परमनंट शासकीय नोकरी देण्याची जवाबदारी राज्य शासनाने स्वीकारावी, अशी मागणीही नूतन रेवतकर यांनी केली.