नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरू आहे.नुकतेच जळगाव येथे उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांनी मिटविले.त्याप्रमाणे ओबीसींचे आंदोलन सोडवण्याची भूमिका घ्यावी, असे विधान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केले.
ओबीसींच्या वाट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, अशी ओबीसींची भूमिका आहे. मराठा समाजाला आधी चुकीच्या पद्धतीने आरक्षण देण्यात आले होते. आता कशा पद्धतीने सरकार त्यांना आरक्षण देतात ते बघावे लागेल. मात्र, जरांगे यांच्या मागणीवरून ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे.
ओबीसी युवक अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. ते आंदोलन मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी जावे. तसेही सरकारकडे कोणतेही काम शिल्लक नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी जावून आंदोलन मिटवल्यास सरकार काहीतरी करीत आहे असे जनतेला वाटेल, असा टोलाही वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला लगावला.