नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून ओबीसी समाजाचे न्याय मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपोषणाकडे पाठ फिरवितात हे ओबीसी समाजाचे दुर्देव आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मीरला पर्यटनाला जाण्यासाठी वेळ आहे, मात्र ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी त्यांना वेळ नाही. इतकेच नाही तर सरकारने मनोज जरांगेसाठी दाखवलेली गंभीरता ओबीसींसाठी का नाही? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
हैदराबाद येथे झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करण्यात आला. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपेक्षा जास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ओबीसी समाजासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. तुम्ही जर ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करा केले तर समाज तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी १० दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी अद्यापही त्यांना भेट दिलेली नाही.
मनोज जरांगेसाठी दाखवलेली गंभीरता मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या टोंगेंसाठी दाखवावी आणि त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी यावे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.