नागपूर : लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कीर्ती महाविद्यालय,समाजकार्य पदविका बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘खाकीतील सखी’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. आयुक्त,लोहमार्ग पोलीस, डॉ.रवींद्र शिसवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाला सर्व्ह विथ श्रद्धा संस्थेच्या संस्थापिका श्रद्धा सिंग या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस,श्री.विजय तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजकार्य पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबत खाकीतील सखी हे अभियान राबविले.
सर्व विद्यार्थ्यांनी सर्व महिला प्रवासी यांना या अभिनव उपक्रमाची माहितीपत्रक देऊन त्यांना सक्रिय सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. समुदाय पोलिसिंग अंतर्गत अत्यंत अभिनव पद्धतीने महिला सुरक्षा या विषयावर हा उपक्रम भविष्यात सर्वदूर राबविणे काळाची गरज असल्याचे नमूद केले.