नागपूर : महानगरपालिकेत झालेल्या बोगस भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सोमवारी (ता. 18) निवेदन दिले. बोगस भरती प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले.
नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नेते अधिकाराचा दुरूपयोग करून ओळखीच्या उमेदवारांना विविध पदांवर भरती करीत आहेत. याच पद्धतीने भरती झालेले दोन कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून पगार घेत असल्याचे अलीकडेच उघड झाले. अपात्र उमेदवारांची शिफारस करणारे, त्यांना नियुक्तीपत्र देणारे, त्यांची हजेरी लावणारे, पगार बिल मंजूर करणारे अशा सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिका-यांनी केली. महानगरपालिकेत बोगस कर्मचारी भरती व भ्रष्टाचार करणा-या रॅकेटचा शोध न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. महापालिका बोगस कर्मचा-यांना नियमित वेतन देते; मात्र याचा आर्थिक भार प्रामाणिकपणे कर भरणा-या सामान्य नागरिकांना सोसावा लागतो, ही बाब पदाधिका-यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड, माजी नगरसेवक मनोज सांगोले, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, सूरज आवले, संतोष लोणारे, आशुतोष कांबळे, पीयूष लाडे, सनी पांडे, राजेश साखरकर, संदेश लोणारे इत्यादी उपस्थित होते.