नागपूर : पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असं म्हणत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त वक्तव्यासाठी विरोधकांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळेंवर हल्लाबोल केला.
येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत. सत्ताधाऱ्यांवर पत्रकारांची करडी नजर असते. परंतु हा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना चिरीमिरीचे आमिष देण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात, हे भाजप पक्षाचे दुर्दैवच म्हणाले लागेल. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरण असल्याची टीका पटोले यांनी केली.