मुंबई : शुक्रवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाचे नागपुरात पूरजन्य परिस्थितीत निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. एकीकडे नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खेडबोलं सुनावले. खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई, नागपूरात काय घडत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घरी कॅमेरे फिरतायेत, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड मधील कलाकार जमा होत आहे.
महाराष्ट्र संकटात आहे. नागपूरमध्ये पूर आला अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक भागात दुष्काळ आहे. मुख्यमंत्री तिथे असायला हवेत. पण तुम्ही उत्सव साजरा करतायेत. गणपती उत्सव साजरा करू नका हे मी म्हणत नाही. परंतु ज्यारितीने अनेक हिरो-हिरोईनची तुमच्या घरी मांदियाळी सुरु आहे. त्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंब मज्जा घेत आहेत. फोटो सेशन सुरु आहे. राज्यातील जनता दु:खाच्या डोंगराखाली दबली आहे, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान तुम्ही परदेश दौऱ्यावर कोणती गुंतवणूक आणायला चालला आहात. जी गुंतवणूक गुजरातमध्ये गेली ती पहिली आणा. मुंबईतून मोठमोठे आंतरराष्ट्रीय संस्था, कार्यालये अहमदाबादला जातायेत ते आणा त्यानंतर परदेश दौऱ्यावर जा, असा सल्लाही राऊतांनी शिंदेंना दिला.