नागपूर : भटक्या संवर्गाच्या महाराष्ट्रातील ३.५ टक्के आरक्षणात गैरआदिवासी धनगरांना भटक्या संवर्गात आरक्षण देण्यावरून आदिवासी समाजाने विरोधाची भूमिका घेतली. यापार्श्वभूमीवर समविचारी संघटनांची वज्रमुठ बांधून संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.
धनगरांना अनुसूचित जमातीत समावेश करून लाभ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा शिंदे सरकारच्या निर्णयाचा आदिवासी संघटनांनी निषेध केला आहे.
सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास या साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशाराही संयुक्त आदिवासी कृती समितीचे विनोद मसराम यांनी दिला आहे.
आदिवासी आरक्षणाच्या प्रश्नासाठी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गोंडवाना विकास मंडळ, गोंडवाना गणतंत्र पार्टी, ट्रायबल आफीसर्स फोरम, ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन,आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ, विदर्भ ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन, भाजपा आदिवासी आघाडी, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस यांच्यासह आरक्षणाच्या मुदयावर राज्यात प्रभावीपणे काम करणारी आदिवासींच्या न्यायिक अधिकारासाठी लढणारी अग्रणी संघटना अशी ओळख असणारी ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट) आदी संघटनांनी मोट बांधली आहे.