नागपूर: नागपूर शहरात २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या नुकसानाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.३) आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात आयुक्तांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, मनोज सिंग, उज्ज्वल धनविजय, अजय पझारे, अनिल गेडाम, अजय माटे आदी उपस्थित होते.
ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नाले आणि पुलांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये नाल्यांचे १६३.७० कोटी व रस्त्यांचे ५३.४० कोटी असे एकूण २१७ कोटी रुपयांचे नुकसान झालेले असल्याची माहिती बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिली. पुरग्रस्त भागांमध्ये नाले आणि रस्त्यांची दुरावस्था झालेली असून त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीच्या दृष्टीने सविस्तर प्रस्ताव सादर करणे तसेच ज्या भागातील नाल्याची भिंत पडलेली आहे, अशा भागांमध्ये तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
नागपूर शहरातील विविध भागांमधील जुने धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. नागपूर शहरामधील पुरग्रस्त भागातील घरांच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची देखील माहिती बैठकीमध्ये सादर करण्यात आली.