नागपूर :ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अविभाज्य अंग आहेत, ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व सोयी सुविधा मिळवून देण्याकरीता तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याकरिता कार्यरत शहरातील विविध संस्थांचा नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्य वतीने सत्कार करण्यात आला.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात गुरुवार (ता. ५) रोजी ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यरत संस्थांचा सत्कार व चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मनपाचे उपायुक्त श्री. विशाल वाघ आणि समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्याहस्ते ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यरत विविध संस्थांच्या प्रतिनिधींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खामला येथील ज्येष्ठ नागरिक मंडळचे अध्यक्ष श्री. हुकूमचंद मिश्रीकोटकर, सचिव श्री. काशिनाथ धांडे, सिनियर सिटिझन्स कौन्सील ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष श्री. मनोहर खर्चे, सचिव श्री. सुरेश रेवतकर, सी.जी.एच.एस. लाभार्थी कल्याण संघ ऑफ इंडियाचे सहसचिव श्री. सुरेश डोरले, सचिव श्री. सुरेश गावंडे, फेसकोम समितीचे श्री. वसंत कळंबे, आखिल भारतीय पुलक जन चेतना मंच-पुलक मंच परिवारचे श्री. शरद मचाले, श्री. रमेश उदेपुरकर, डॉ. कमला मेहता यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, समाज विकास विभागाचे अधिक्षक श्री. सुरेंद्र सरदारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा समाज विकास विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यरत संस्थांकडून वर्षभराचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार प्राप्त प्रस्तावानुसार कार्यक्रमात संस्थांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करित उपायुक्त श्री. विशाल वाघ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता नागपूर महानगरपालिका सदैव तत्पर असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध योजनांसंदर्भात जनजागृती, त्यांना भेडसावणाऱ्या समस्याचे समाधान आणि हवी असणारी मदत करण्यासाठी मनपाद्वारे सर्व सकारात्मक पाऊले उचलण्यात येईल याची ग्वाही उपायुक्त श्री. विशाल वाघ यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले. त्यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपा समाज विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तसेच मनापाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलती व त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. चर्चासत्रादरम्यान ज्येष्ठ नागरिक मंडळचे अध्यक्ष श्री. हुकूमचंद मिश्रीकोटकर, श्री. मनोहर खर्चे, श्री. सुरेश रेवतकर, श्री. सुरेश डोरले, श्री. सुरेश गावंडे, श्री. वसंत कळंबे, श्री. शरद मचाले, डॉ. कमला मेहता यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शारदा भुसारी यांनी तर आभार श्रीमती नूतन मोरे यांनी मानले.