नागपूर:गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांना गणेशोत्सव मंडळे, आयोजक संस्था आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नवरोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या तयारीला लागलेली आहे. नवरात्रोत्सव मंडळानी या उपक्रमालाही भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी मागील वर्षी सुरू केलेल्या ‘सांस्कृतिक गणेशोत्सव’ उपक्रमाला यंदा गणेशोत्सव मंडळे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणा-या संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागपूरच्या विविध भागातील 200 गणेशोत्सव मंडळांमध्ये 1700 कलाकारांनी विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम सादर करीत भाविकांचे मनोरंजन व प्रबोधन केले. संस्कार भारतीच्या संयोजनात नाट्य संगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तिगीत, अभंग, देशभक्तीपर गीत, गीतरामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपरिक खेळ, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन (हिंदी व मराठी), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम, बँड व ढोलताशा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता यावे, यासाठी आयोजन समितीने विधानसभा क्षेत्र निहाय नवरात्र मंडळांना संपर्क व समन्वय स्थापित करण्याकरिता संयोजकांची नियुक्ती केली आहे. ज्या मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी पश्चिम क्षेत्र- दिलीप जाधव – 9823132858, दक्षिण पश्चिम – नितीन तेलगोटे – 9373106333 आणि मनिषा काशीकर – 9822430460, दक्षिण – संदीप गवई – 9822472473, मध्य – किशोर पाटील – 9422107373, उत्तर – भोलानाथ सहारे – 9766790096 व पुर्व – महेंद्र राऊत- 982225689 यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.