नागपूर : वेश्याव्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुना वस्तीतील तरुणींना ग्रामीण भागातील हॉटेल, ढाब्यावर नेऊन देहव्यापार करवून घेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खापरखेड्यातील गुप्ता नावाच्या युवकाने आईच्या मदतीने गंगाजमुनातील तरुणींकडून देहव्यापार सुरु केला होता.याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी छापा घालून दोन तरुणींना ताब्यात घेतले तर तिघांना अटक केली.
माहितीनुसार. आरोपी अजय हनुमानप्रसाद गुप्ता, मावसभाऊ राहुल तिलकचंद गुप्ता आणि आई चंदा गुप्ता हे तिघेही खापरखेड्यातील जयभोलेनगर-चनकापूर येथे राहतात. या तिन्ही आरोपींनी आपल्या घरी देहव्यापार सुरु केला. गंगाजमुनातील दोन्ही तरुणी अजयने घरी मुक्कामी ठेवल्या होत्या.
गावातील आणि पंचक्रोशीतील आंबटशौकीन तरुण अजयच्या घरी येणे जाणे करत होते. तसेच अजय हा काही तरुणी देहव्यापारासाठी ढाब्यावरही पाठवित होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून गुप्ता याच्या घरी छापा टाकला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, बट्टूलाल पांडे, नाना राऊत, विनोद काळे, प्रमोद भोयर, नीतू खोब्रागडे, कविता बचले यांनी ही कारवाई केली. खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्या तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.