नागपूर : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागपुरात ठिकठिकाणी देवीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळपासूनच ‘जय माता दी’ च्या जयघोषात ढोल तशांच्या गजरात मातेचे थाटात आगमन झाले आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस एकच उत्साह, नवं चैतन्य आणि भक्तिमय वातावरणाने सर्वत्र एक ऊर्जा संचारणार आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात दुर्गा देवीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून नऊ दिवस पूजापाठ करण्यात येते.
हा सण देशाच्या विविध भागात दुर्गा पूजा किंवा नवरात्र म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या विविध रूपांच्या पूजेला समर्पित आहे. या नऊ दिवसांमध्ये, भक्त देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा करतात आणि विविध धार्मिक विधी, प्रार्थना आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये भाग घेतात. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला, कलशाची विधीपूर्वक स्थापना केली जाईल ९ दिवस उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प केला जाईल.
नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे गरबा. अनेक ठिकाणी गरबा खेळला जातो. आबालवृध्द दांडिया नृत्यामध्ये सहभाग घेतात. काही ठिकाणी दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे